🕒 1 min read
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीसह इतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अचानक खूप जास्त सक्रीय झाल्या असून महाविकास आघाडीतील अनेक नेते सध्या अडचणीत येत चालले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेते या तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
महाविकास आघाडीतील नेते हे भाजप तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. तर भाजप जे काही सुरु आहे ते नियमांनुसारच सर्व कारवाही होत असल्याचा दावा करत आहे. या कारवाईचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचे भाजपनेते सांगत आहे. दरम्यान, ईडीसह इतर राष्ट्रीय तपास यंत्रणा राज्यात अचानक सक्रीय का झाल्या ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून या यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आतापर्यंत कोणकोणते नेते कोणकोणत्या प्रकरणामुळे अडचणीत येऊ शकतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.
अजित पवार
२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ED नं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात परवा ईडीनं मोठी कारवाई करत साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता, इमारत आणि जमीन जप्त केली आहे. सगळी जवळपास ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर आता राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.या प्रकरणात अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने टाकलेल्या लेटर बॉम्ब मध्ये देखील अजित पवारांचे नाव आले असल्याने त्या प्रकरणामुळे देखील पवार यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
अनिल देशमुख
राज्यात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED मार्फत होत असलेल्या चौकशीचा विषय चर्चेचा मुद्दा बनला आहे. यातच माजी आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात राजकीय खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांना ईडीने तिसरं समन्स बजावलं आहे. देशमुख यांना येत्या 5 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाले असून सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अनिल परब
माजी आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यात राजकीय खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला आहे. देशमुख यांच्यावरील वसुलीच्या आरोपांप्रमाणेच अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर बडतर्फ सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंह यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी अशी मागणी होऊ लागल्याने आगामी काळात परब देखील राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर येऊ शकतात.
प्रताप सरनाईक
टॉप सिक्युरिटी घोटाळाप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयवर धाडी टाकल्या होत्या. या धाडीमध्ये प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीने चौकशी करता ताब्यात घेतलं होतं. जवळपास पाच तास विहंग सरनाईक यांची चौकशी केली. सरनाईक कुटुंबीयांचे निकटवर्तीय अमित चांडोले यांना चौकशी करून ईडीने अटक केली होती.
अविनाश भोसले- अमित भोसले
गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित याची काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 5 तास चौकशी केली. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. भोसले यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांशी असणारे संबंध सर्वश्रुत आहेत.अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.
महत्वाच्या बातम्या
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

