टीम महाराष्ट्र देशा : उदयनराजे भोसले यांचे समर्थकांनी आज सातारा बंदची हाक दिली आहे. पोवई नाका चौकात गाढवांची धिंड काढून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी ( दि १७ ) शुक्रवारी सांगली बंदची हाक दिली आहे. आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पण उडी घेतली आहे. त्यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. हि बैठीक पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ते म्हणाले, “देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार आहे”.
प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे की, “या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे.
वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे ३५ प्रमुख पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. या सर्वांनीच बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सीएए व एनआरसीसोबतच देशाच्या आर्थिक स्थितीवरही आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत सर्वांचेच होते. त्यानुसार या सर्व मुद्द्यांवर मुंबईसकट महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

