मुंबई : अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, सातबारा कोरा कधी करणार, सरकारने उत्तर द्यावं, विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची मागणी केली आहे. विधानसभेचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराबाबत चर्चा करावी अशी मागणी फडणवीस यांनी विधानसभेत केली.
या दोन्ही विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र प्रश्नोत्तरांचा तास झाला पाहिजे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. फडणवीसांचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच सध्या विधानसभेचे कामकाज सुरू होते. पण, गदारोळ वाढल्याने सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जमुक्तीचं दिलेलं वचन पूर्ण करावं या मागणीसाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
महाविकासआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत दिली नाही, फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे.


