टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार मैदानात न उतरवता राज्यामध्ये जोरदार सभा घेतल्या आहेत. त्यांच्या सभांमुळे काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला फायदा मिळणार हे निश्चित आहे. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांमध्ये आपले स्थान प्रबळ केल्याने मनसेला विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. तर काँग्रेस नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’चीच भूमिका घेणार, असे दिसते.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला मनसेची साथ हवीये तर काँग्रेस नेते विरोध करत आहेत. राज ठाकरे यांच्या मराठी बाण्यामुळे काँग्रेसची व्होटबँक असणारी अमराठी मते युतीला जाण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही, असं विधान केल आहे.
निरुपम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांचा मनसेला आघाडीत घेण्यास विरोध असल्याने मनसे आघाडीत न जाता विधानसभेला स्वबळावर लढेल आणि राष्ट्रवादी त्यांना छुपा पाठिंबा देईल, अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांनी देखील मनसे कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निकालाची काळजी न करता विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

