सिंधुदुर्ग : ‘नागरिकत्व दुरुस्त विधेयकाबाबत राजकीय पक्षांची काही नेतेमंडळी समाजात वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत असल्याचे भाजपाचे प्रमुख प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.
ते वेंगुर्ला येथे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘२०१९ मध्ये भारतीय नागरिकत्व कायद्यात केलेल्या दुरुस्तीबाबत अत्यंत खोटे बोलून, अपप्रचार करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम गेले काही दिवस सातत्याने सुरु आहे. जनतेने या दुरुस्ती केलेल्या कायद्यातील सत्य समजून घ्यावे,’ असे भांडारी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. केवळ राजकारणासाठी जे समाजात संघर्ष भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडे जनतेने पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन भांडारी यांनी केले.
दरम्यान, भांडारी म्हणाले, ज्या मुद्यावर आम्ही मते मागितली त्या मुद्यावर काम करणे आमचे कर्तव्य आहे, आणि ते आम्ही करीत आहोत. या कायद्यात केलेली दुरुस्ती वास्तविक सर्वसमावेश आहे. या दुरुस्तीमुळे कोणाला नागरिकत्व सिद्ध करण्याचा तसेच कोणतीही कागदपत्रे मागण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही.


