🕒 1 min read
मुंबई : ठाकरे सरकारने राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मात्र त्यानंतर विरोधकांनी सावकारी कर्जमाफी होणार का, या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर आता ठाकरे सरकारने आता पुन्हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सावकारांनी त्यांच्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेले कर्जही आता माफ करण्यात येणार आहे.
मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 38 हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार असून, त्यांनी सावकरांकडून घेतलेले 37 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
शासन निर्णयानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील, तर सरकारकडून त्या संबंधीत सावकारास रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्जही माफ होणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील 412 सेवा सहकारी संस्था, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोलाच्या सर्व शाखा, 7 कृषी उत्पन्न बाजार समित्या, 7 खरेदी विक्री सहकारी संस्था, 7 बलुतेदार सहकारी संस्था, 47 नागरी बिगर कृषी सहकारी पत संस्था, 154 कर्मचारी सहकारी पतसंस्था, 69 सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था, 84 गृहनिर्माण सहकारी संस्था, 57 मत्स्य सहकारी संस्था, 30 दुग्ध सहकारी संस्था, 5 विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार यांचेकडे सावकारी कर्ज माफी योजनेंतर्गत अर्ज उपलब्ध आहेत.


