🕒 1 min read
मुंबई : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदअंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून, या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी तसेच खासगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला जातो. यात शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असतो. सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत कर्जाचे वितरण केले जाते. शेतकरी नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेत असताना त्याला सात-बारा उताऱ्यापासून ते बँकांचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करण्यास बराच कालावधी लागतो. कधी कधी हंगामही संपून जातो. नाइलाजाने शेतकऱ्यांना खासगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागते.
यासाठी शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबवण्यात येत आहे.अल्प मुदतीकरिता प्रथमत: पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यास प्रति प्रकरण रुपये १५० तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या नवीन कर्ज प्रकरणाचा सेवाशुल्क रुपये २५० इतका असेल. मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्ज प्रकरणाच्या नूतनीकरणाचा दर प्रति प्रकरण रुपये २०० इतका आहे. कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
कृषी कर्ज मित्राला शेतकऱ्याच्या शिफारशीसह सेवाशुल्क मागणी यादी बँकेकडे सादर करावी लागणार असून, बँकेकडून त्याची शहानिशा झाल्यानंतर त्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सेवाशुल्क अदायगीसाठी यादी सादर केली जाणार आहे. या योजनेचा कालावधी सन २०२१-२२ असा असून आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी वाढवणे वा कमी करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. या शासन निर्णयामुळे गरजू शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचेही ग्रामविकास व कामगारमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- बिहारींना पोटासाठीच नव्हे शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं?, कन्हैय्या कुमारचा सवाल
- IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ
- ‘कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास…’, सामाजिक न्याय मंत्रालयाची महत्त्वाची मागणी
- कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतच्या नात्यासंदर्भात अरूसा आलम यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या…
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

