डेहराडून : देशातील काही राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने अनेक राज्यांमध्ये थैमान घातले असून उत्तराखंड आणि केरळमध्ये पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. उत्तराखंड राज्यात येत्या 19 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. आज राज्यातल्या डेहराडून, तेहरी, अलमोरा, पौरी, हरिद्वार, चम्पावत आणि नैनिताल या भागात जोरदार पावसाची शक्यता असून या भागात धोक्याचा लाल इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये कालही सकाळपासून संततधार होती. राज्याने सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे. वादळी पावसाचा इशारा लक्षात घेता आज राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी राज्य सतर्क असल्याची ग्वाही मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली आहे.
दरम्यान, दुसरीकडे केरळमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यु झाला आहे. कोट्टायम जिल्ह्यात 13 जण बेपत्ता झाले असून, इडुक्की जिल्ह्यात नऊ लोकांच्या मृत्युची नोंद झाली. थिरूवअनंतपुरममध्ये एक जण वाहून गेल्याची माहिती आहे.इडुक्की जिल्ह्यात कोक्कायार परिसरात ढिगाऱ्याखालून चार मुलं, एक पुरूष आणि एक महिला यांना वाचवण्यात यश आलं आहे.
अजून दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोटीकल पंचायतमध्येही पुन्हा दरड कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखालून 8 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. राज्यातील सर्व परिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केरळमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये 23 जणांचा मृत्यु ;13 जण बेपत्ता
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’
- दरमहा 3500 रुपये मिळण्याचा मेसेज तुम्हालाही आला असल्यास वेळीच सावध व्हा!


