नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. बुधवारी त्यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली. सिब्बल यांनी काँग्रेस हायकमांडवर विशेषत: राहुल गांधींवर प्रश्न उपस्थित केले होते, अशा स्थितीत काँग्रेस त्यांना क्वचितच राज्यसभेवर पाठवेल, असे मानले जात होते.
अर्ज दाखल केल्यानंतर सिब्बल म्हणाले की, त्यांनी 16 मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. सिब्बल सध्या यूपीमधून काँग्रेस कोट्यातून खासदार आहेत. पण यावेळी पक्षाकडे यूपीमध्ये पुरेसे आमदार नाहीत, जे त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवू शकतील. त्यामुळे सिब्बल यांच्या भवितव्याबाबत अटकळ बांधली जात होती. आता समाजवादी पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी दाखल करून त्यांनी सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये सिब्बल यांच्या तिकिटावरील सस्पेंस कायम असताना, त्यावेळी तीन मोठे विरोधी पक्ष त्यांना त्यांच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत होते. उत्तर प्रदेशातून सपा, बिहारमधून आरजेडी आणि झारखंडमधून झामुमोने सिब्बल यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मूड बनवला होता. मात्र, सिब्बल यांनी अखिलेश यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
सिब्बल यांनी यापूर्वी काँग्रेसच्या चिंतन शिबिरातही हजेरी लावली नव्हती. मार्चमध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांनी गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला होता.
महत्वाच्या बातम्या :

