औरंगाबाद : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने दोन जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापर्यंत आयडिया कॉल सेंटरच्या इमारतीत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी पालिकेने केली आहे. या ठिकाणी ११०० रुग्णांची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे बेड्सची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील महिनाभरापासून कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढत असल्याने शहरात उपलब्ध बेड्स व आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेवरून जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी सुरू केली आहे. पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सोबत घेत काही जागांची पाहणी मागील आठवड्यात पाहणी केली.
त्यानंतर आयडिया कॉल सेंटर व मराठवाडा रियलेटर्स कंपनी या दोन ठिकाणी जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. आयडिया कॉल सेंटरमध्ये ११०० तर मराठवाडा रियलेटर्स कंपनीत चारशे अशा एकूण १५०० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. या दोन्ही पैकी आयडिया कॉल सेंटरमधील कोविड केअर सेंटर पुढील आठवड्यात सुरु होईल, असे संकेत प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी (दि.५) दिले.
पालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये सध्या सुमारे एक हजार बेड्स शिल्लक आहेत. त्याशिवाय तीन ते चार ठिकाणचे कोविड केअर सेंटर पालिकेने अद्याप सुरु केले नाहीत. हे सेंटर सुरु झाल्यावर त्या ठिकाणी किमान एक हजार बेड्सची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे जम्बो केविड केअर सेंटर लगेच सुरु करण्याची गरजही पडणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अब्दूल सत्तारांवर आता कारवाई करणार का?’, खा.जलील यांचा सवाल
- ‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा
- गंभीर कोरोनाबाधितांसाठी मनपाने मागवले दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन
- राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता; जयश्री पाटील यांनी दाखल केली कॅव्हेट
- व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बरं, शिवेंद्रराजे कडाडले


