टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतरावर भाष्य करताना भाजपवर टीका केली आहे. त्यांनी भाजप आता ५० टक्के काँग्रेसमय झाली आहे. त्यामुळे भाजपने आपलं चिन्ह बदलून ‘कमळावर घड्याळ आणि हात’ असं ठेवावं असा सल्ला भाजपला दिला आहे. तसेच भाजपची बिर्याणी झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनाही मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पडलं आहे, अशा शब्दात आव्हाडांनी पाटलांवर टीका केली.

तसेच पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाला लागलेल्या गळतीमुळे पक्षाध्यक्ष शरद पवार ‘जखमी’ झाले आहेत अस विधान केले आहे. तसेच मधुकर पिचड यांच्याकडून अपेक्षा नव्हती. पुरोगामी महाराष्ट्राची वाच्यता करणारे जातीयवाद्यांच्या कळपात जाऊन बसले आहेत. तसेच शिवेंद्रराजेंबद्दल आश्चर्य वाटतं. छत्रपतींचे वारसदार असूनही त्यांच्यामध्ये लढण्याची जिद्द नाही असही आव्हाड पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर, आमदार वैभव पिचड,माजी मंत्री मधुकर पिचड यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.


