टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वार्थासाठी अन्य पक्षांतील नेते भाजपमध्ये येतात, या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतर करणाऱ्या सहकाऱ्यांना टोला लागावला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने विरोधी पक्षातील अनेक नेते भाजप तसेच शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
याचदरम्यान निवडणुकांच्या तोंडावर अनेक जण पक्ष प्रवेशासाठी इच्छुक आहेत. आपल्या स्वार्थासाठीच अन्य पक्षांतील ही नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष प्रवेश करण्यामागे त्यांचा स्वार्थ असला तरी सत्तेत राहून जनतेची कामे करता येतात. सत्ताधारी पक्ष किंवा निवडणुकीत ज्या पक्षाला यश मिळते त्या दिशेने जाण्याचा कल राजकारणात नेहमीच असतो. त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे, असे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.
मित्रांनो इतके का लाचार होता ..
ज्यांच्या कडे जात आहेत ते काय म्हणतात ते तर वाचा #लाचार https://t.co/5MTWWBMaWF— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 26, 2019
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील सहकाऱ्यांना टोला लगावला आहे. मित्रांनो इतके का लाचार होता, ज्यांच्या कडे जात आहेत ते काय म्हणतात ते तर वाचा. असा टोला आमदार आव्हाड यांनी लगावला.


