मुंबई : राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांच्या खासगी आयुष्यावर टिपणी करणे चुकीचे आहे, असा सल्ला अमृता फडणवीसांनी बंडा तात्यांना दिला आहे. ही मानसिकता बदलावी लागेल, असेही अमृता यावेळी म्हणाल्या. त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, स्त्रियांनी आपल्या देशात आधीच खूप सहन केलेलं आहे. आताही त्यांच्या नशिबी वयक्तीक पातळीवर टीका होत आहे. काय बोलायला पाहिजे आणि काय नको याबाबत विचार करायला पाहिजे. आपल्या देशात स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार होतात, त्याच्या बातम्या येतात आणि मग आंदोलने मोर्चे निघतात, ही मानसीकता आपल्याला बदलायची आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) या दारू पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे. त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी बंडातात्यांच्या पुतळ्याचं दहन केलं जात आहे. हा वाद वाढत चालल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे.
महत्वाच्या बातम्या

