मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या क्वालिफायर २ (Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने बंगळुरूचा (RR vs RCB) ७ गड्यांनी पराभव केला आणि फायनलचे तिकीट मिळवले. या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रसिध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय यांनी तिखट मारा करत बंगळुरूला १५७ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात खेळताना सलामीवीर फलंदाज जोस बटलरच्या लीगमधील चौथ्या शतकाच्या (नाबाद १०६) जोरावर राजस्थानने १९व्या षटकात सामना जिंकला. आता फायनलध्ये राजस्थानचा सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सशी होईल. २९ मे रोजी याच स्टेडियमवर ही महालढत होणार आहे. तब्बल १४ वर्षानंतर राजस्थान संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
राजस्थानचा डाव
बंगळुरूच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी जलद सुरुवात केली. पहिल्याच षटकात राजस्थानने धावा ठोकल्या. जयस्वाल आणि बटलरने यांनी पहिल्या गड्यासाठी ६१ धावा जोडल्या. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने जयस्वालला बाद करत ही भागीदारी मोडली. जयस्वालने एक चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने अर्धशतक पूर्ण केलेल्या बटलरला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. वानिंदू हसरंगाने १२व्या षटकात सॅमसनला बाद केले. सॅमसनने १ चौकार आणि २ षटकारांसह २३ धावा केल्या. आव्हानाच्या जवळ पोहोचल्यानंतर बटलरने स्फोटक फटके खेळत आपल्या चौथ्या शतकाकडे कूच केली. १८व्या षटकात बटलरने लीगमधील चौथे शतक ठोकले. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बटलरने हर्षल पटेलला षटकार ठोतकत राजस्थानला फायनलमध्ये पोहोचवले. बटलरने ६० चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०६ धावा फटकावल्या.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1530241474398687232
बंगळुरूचा डाव
कप्तान फाफ डु प्लेसिससोबत सलामीला उतरलेल्या विराट कोहलीला आरसीबीसाठी चांगली सलामी देता आली नाही. राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने विराटला (७) यष्टीपाठी झेलबाद केले. मागील सामन्यातील शतकवीर रजत पाटीदारने पुन्हा एकदा संघाला सावरत डु प्लेसिसोबत अर्धशतकी भागीदारी केली. ११व्या षटकात डु प्लेसिसला ओबेद मॅकॉयने अश्विनकरवी झेलबाद करत ही भागीदारी तोडली. डु प्लेसिसने ३ चौकारांसह २५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने १३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची खेळी केली. १४व्या षटकात त्याला बोल्टने बाद केले. मॅकॉयने त्याचा सुंदर झेल घेतला. १५व्या षटकात पाटीदारने चहलला षटकार खेचत आपले अर्धशतक फलकावर लावले. पुढच्याच षटकात तो अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावा केल्या. पाटीदारनंतर आरसीबीचा डाव गडगडला. १९व्या षटकात प्रसिध कृष्णाने दिनेश कार्तिक (६) आणि वानिंदू हसरंगा (०) यांना लागोपाठ चेंडूव तंबूचा मार्ग दाखवत आरसीबीला मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले. २० षटकात बंगळुरूने ८ बाद १५७ धावा केल्या. राजस्थानकडून कृष्णा आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

