मुंबई : कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर क्रिकेटप्रेमींना उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळाला. आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs RCB) १४ धावांनी मात देत विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रजत पाटीदारच्या दमदार शतकाच्या जोरावर बंगळुरूने लखनऊला २०८ धावांचे आव्हान दिले. डु प्लेसि्स, विराट कोहली अपयशी ठरल्यानंतर पाटीदारने नाबाद ११२ धावांची खेळी करत बंगळुरूला मजबूत धावसंख्या गाठून दिली. प्रत्युत्तरात लखनऊकडून केएल राहुलने (७९) जबरदस्त झुंज दिली, पण १९व्या षटकात तो बाद झाला आणि लखनऊला स्पर्धेबाहेर व्हावे लागले.
लखनऊचा डाव
बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने क्विंटन डी कॉकला (६) स्वस्तात बाद करत लखनऊला लवकर धक्का दिला. कप्तान केएल राहुलने झुंजार खेळी करत बंगळुरूच्या आव्हानाकडे वाटचाल केली. मनन वोहरा (१९) पॉवरप्लेमध्ये बाद झाल्यानंतर दीपक हुडाने राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगल्या परिस्थितीत आणले. हुडाने २६ चेंडूत एक चौकार आणि ४ षटकारांसह ४५ धावा केल्या. फिरकीपटू वानिंदू हसरंगाने हुडाची दांडी गूल केली. राहुलने १४व्या षटकात अर्धशतक साजरे केले. १८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने मार्कस स्टॉइनिसला बाद करत लखनऊला संकटात टाकले. शेवटच्या २ षटकात लखनऊला ३३ धावांची गरज होती. मोहम्मद हेझलवूडने टाकलेल्या १९व्या षटकात राहुल आणि कृणाल पंड्या झेलबाद झाले. राहुलने ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७९ धावांची झुंजार खेळी केली. तर कृणालला खातेही खोलता आले नाही. शेवटच्या षटकात लखनऊला २४ धावांची गरज होती, पण लखनऊला ९ धावाच घेता आल्या. २० षटकात लखनऊने ६ बाद १९३ धावा केल्या. बंगळुरूकडून हेझलवूडने सर्वाधिक ३ बळी घेतले.
We move forward together, one step at a time. ????????
Next stop: Ahmedabad ????✈️#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #LSGvRCB #PlayOffs pic.twitter.com/aBifGSI7WH
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 25, 2022
बंगळुरूचा डाव
लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसिन खानने कप्तान फाफ डु प्लेसिसला शून्यावर बाद करत बंगळुरुला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सावरले. पाटीदारने आक्रमक तर कोहलीने संयमी खेळी करत साथ दिली. आवेश खानने टाकलेल्या नवव्या षटकात कोहली (२५) बाद झाला. १० षटकात बंगळुरूने २ बाद ८४ धावा केल्या. पाटीदारने २८व्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. कृणाल पंड्याने ग्लेन मॅक्सवेलला (९) एविन लुईसकरवी झेलबाद करत बंगळुरूला तिसरा धक्का दिला. १२व्या षटकात महिपाल लोमरोरने चमीराला चौकार ठोकत बंगळुरूला शतक गाठून दिले. रवी बिश्नोईने लोमरोरला (१४)ल बाद केल्यानंतर १४व्या षटकात दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. पुढच्याच षटकात कार्तिकला राहुलने, त्यानंतर पाटीदारला दीपक हुडाने जीवदान दिले. १६व्या षटकात पाटीदारने बिश्नोईला ३ षटकार आणि २ चौकार लगावले. कार्तिक-पाटीदारने २४ चेंडूत अर्धशतकी भागीदारी फलकावर लावली. १८व्या षटकात पाटीदारने आवेश खानला षटकार ठोकत शतक साजरे केले. पाटीदारने ५४ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ११२ धावा केल्या. तर कार्तिकने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३७ धावा ठोकल्या. २० षटकात बंगळुरूने ४ बाद २०७ धावा उभारल्या.
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), एविन लुईस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, मोहसिन खान, आवेश खान, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

