मुंबई : वानखेडे मैदानावर रंगलेल्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सने विजयारंभ केला आहे. मोहम्मद शमीची घातक गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजीत केलेल्या पुनरागमनामुळे गुजरातने लखनऊचा ५ गड्यांनी पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या लखनऊने २० षटकात १५८ धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने तिखट मारा करत ३ बळी टिपले. प्रत्युत्तरात गुजरातनेही अडथळ्यांचा सामना केला, पण डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियामुळे हे आव्हान सहज शक्य झाले. शमीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले
गुजरातचा डाव
डावखुरा फलंदाज मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल यांनी गुजरातच्या डावाची सुरुवात केली. लखनऊच्या दुष्मंथा चमीराने शुबमनला खातेही खोलू दिले नाही. त्यानंतर चमीराच्या भन्नाट यॉर्करवर विजय शंकर माघारी परतला. कप्तान हार्दिक पंड्याने डाव सावरला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. कृणाल पंड्याने हार्दिकला झेलबाद केले. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाला विजयासमीप आणले. मिलरने ३० धावा केल्या, तर तेवतिया २४ चेंडूच ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांवर नाबाद राहिला.
लखनऊचा डाव
गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लखनऊला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने कप्तान केएल राहुलला पहिल्याच चेंडूवर यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर शमीने क्विंटन डी कॉकचा (७) सुरेख त्रिफळा उडवला. यानंतर आलेल्या एविन लुईसचा शुबमन गिलने अप्रतिम झेल टिपला. २९ धावांत ४ फलंदाज बाद झाल्यानंतर दीपक हुडा आणि आयुष बदोनीने डाव सावरला या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकापार पोहोचवले. हुडाने ६ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. राशिद खानने त्याला पायचीत पकडले. त्यानंतर कृणाल पंड्याने बदोनीसोबत धावा केल्या. १९व्या षटकात बदोनीने लॉकी फर्ग्युसनला षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात तो झेलबाद झाला. बदोनीने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. २० षटकात लखनऊने ६ बाद १५८ धावा केल्या कृणाल २१ धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून शमीने ३ तर वरूण आरोनने २ बळी टिपले.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 GT vs LSG : हुडा, बदोनीमुळं लखनऊ सावरलं; गुजरातला मिळालं १५९ धावांचं आव्हान!
- IPL 2022 : …अन् दीपक हुड्डाची धमाकेदार खेळी बघून कृणाल पंड्याही झाला खूश; वाजवल्या टाळ्या!
- IPL 2022 : ‘जानी दुश्मन’ कृणाल-दीपक झाले लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग; नेटकऱ्यांचे मजेदार मीम्स व्हायरल!
- IPL 2022 : शुबमन गिलनं घेतलेला ‘हा’ कॅच पाहिलात, तर तुम्हाला कपिल देव यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही!
- VIDEO : मॅच सुरू होऊन दोन मिनिटं झाली अन्..! पाहा शमीच्या पहिल्याच चेंडूवर कसा आऊट झाला केएल राहुल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

