🕒 1 min read
मुंबई : भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे . या भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने सोशल मीडियावर भावनिक पत्र लिहीत ही घोषणा केली. मिताली राजने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘इतक्या वर्षांच्या प्रेम आणि समर्थनासाठी तुम्हा सर्वांचे आभार. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने मी माझी दुसरा प्रवास सुरू करणार आहे.’
यासोबत मिताली राजने पत्रात लिहिले की, “इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. यामुळे मला एक व्यक्ती म्हणून निश्चितच आकार मिळाला आणि आशा आहे की भारतीय महिला क्रिकेटलाही आकार देण्यास मदत झाली असेल.” मिताली राजने स्वतःच्या पत्रात चाहत्यांचे आभार मानण्यासोबतच बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांचेही आभार मानले आहेत.
उजव्या हाताची फलंदाज मिताली राजने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. भारतासाठी २३२ एकदिवसीय सामने खेळताना तिने ५०.६८ च्या सरासरीने ७८०५ धावा केल्या आहेत. जून १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत मिताली राज भारतीय संघाची कर्णधार होती. या स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी करत उपांत्य फेरीसाठीही पात्रता मिळवली नाही.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१७ आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला होता. जिथे संघाला इंग्लंडकडून फार कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारत २००५ च्या महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली होती. मिताली महिला टी-२० चॅलेंजमध्ये वेलोसिटी संघाची कर्णधारही होती.
३९ वर्षीय मिताली राजने भारतासाठी १२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिच्या नावावर ६९९ कसोटी धावा, ७८०५ एकदिवसीय धावा आणि २३६४ टी-२० धावा आहेत. जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये मिताली राजची कायम गणना केली जाते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
