🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकातील सगळ्यात रोमांचक आणि लक्षवेधी असा भारत वि.पाकिस्तान सामना आज मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानवर होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांनी जय्यत तयारी केली असून मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदान देखील सज्ज झाले आहे. कारण गेले दोन दिवस मँचेस्टर शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आजचा सामना होईल का? असा प्रश्न चाहत्यांना आणि आयसीसी क्रिकेट मंडळला पडला होता. मात्र मँचेस्टर येथीस सद्यस्थिती पाहता सूर्यानं सकाळच्या सत्रात दर्शन दिले आहे. सद्य स्थितीला पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यावरचे पावसाचे सावट तूर्तास तरी टळले आहे. मात्र दुपारनंतर पावसाचे संकेत असणार आहेत.

जगातील अनेक देशातून क्रिकेट चाहत्यांनी आणि खासकरून भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांनी आजच्या भारत – पाक सामन्यासाठी मँचेस्टरमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे मँचेस्टरमध्ये उत्साहवर्धक आणि रोमांचक वातावरण तयार झाले आहे. विश्वचषकातील भारत- पाकिस्तान सामना हा प्रतिष्ठेचा सामना मानला जातो त्यामुळे दोन्ही देशांच्या संघाकडून या सामन्यासाठी जोरदार तयारी केलेली असते. मात्र असे असले तरी आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत सहावेळा भारत – पाकिस्तान संघ समोरासमोर आले आहेत आणि प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघ विजयी होईल, अशी शक्यता कोट्यवधी भारतीयांकडून व्यक्त होत आहे.

भारत पाक सामन्यासाठी सट्टे बाजारात देखील बुकींकडून जोरदार बेटिंग सुरु आहे. मुंबई, सुरत व दिल्लीतील सट्टेबाजारात भारतीय संघाचे पारडे जड आहे.तर आतापर्यंत गेल्या दोन दिवसांमध्ये कोट्यवधीचा सट्टा खेळला गेला आहे. रविवारी दुपारपर्यंत त्यामध्ये तिपटीने वाढ होईल, अशी शक्यता बुकींकडून वर्तविण्यात येत आहे.भारतासाठी एक रुपयामागे अवघे ३० पैसे दर लावला आहे. तर पाकसाठी १.५० पैसे इतका दर देण्यात आला आहे.
दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जखमी झाल्याने आता सलामीला के एल राहुल येणार आहे. त्यामुळे भारताची सलामीची जोडी पाकिस्तान संघाच्या वेगवान आणि तरबेज गोलंदाजांना कशी सामोरे जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिखर धवन नसल्याने संयमी फलंदाजीची जबाबदारी रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर आली आहे. तसेच अनुभवी खेळाडू म्हणून एम एस धोनी यावर देखील पडत्या काळात संघाला सावरण्याची जबाबदारी असणार आहे.

आजच्या सामन्यासाठी मास्टर ब्लासटर सचिन तेंडूलकरने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचा हुकमी एक्का मानला जाणारा फास्ट बॉलर मोहम्मद अमीर हा भारतासाठी हा घातक ठरू शकतो, त्यामुळे त्याच्यापासून सतर्क राहा, मात्र त्याच्या गोलंदाजीवर आक्रमकपणे प्रहार करा असा सल्ला सचिनने भारतीय संघाला दिला आहे. खासकरून कर्णधार विराट कोहली याला हा सल्ला दिला आहे. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन भारताचे अनुभवी खेळाडू आहेत. पाकिस्तानी गोलंदाजांचं लक्ष्य हे दोघेच असतील. त्यांना तातडीने बाद करण्याचा प्रयत्न आमीर आणि वहाब रियाज करतील. मात्र रोहित-विराटने मोठी इनिंग खेळण्यावर लक्ष द्यावं, अस सचिनने सांगितले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
