औरंगाबाद : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि.२१) साडेबाराच्या सुमारास गळती लागली. या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचे दिसून आले. या घटनेची गंभीर दखल घेत औरंगाबाद शहरात अशी घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व दवाखान्यांचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी एक स्वतंत्र पथक तयार केले आहे.
मनपाचे हे पथक शासकीय तसेच खासगी दवाखान्यांना भेटी देईल. तेथील ऑक्सिजनच्या स्थितीचे मुल्यमापन करून आवश्यक त्या सूचना करणार आहे. कोरोनाच्या या दुसर्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता अधिक भासत आहे. मात्र गरजेपेक्षा ऑक्सिजनचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे.
त्यामुळे औरंगाबाद शहरातील रूग्णालयांमधील उपलब्ध ऑक्सिजनचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पालिकेवर सोपवली आहे. त्यानुसार शहरातील रूग्णालयांमध्ये वापरल्या जाणार्या ऑक्सिजनचे ऑडिट करुन आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी रूग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट करण्यासाठी जिल्हा खनीकर्म अधिकारी अतुल दौड यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार केले आहे.
ऑक्सिजन ऑडिट बद्दल काढलेल्या लेखी आदेशात आयुक्त पांडेय यांनी नमूद केले आहे की, कोरोनाच्या गंभीर रुग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून सेवा दिली जात आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा देखील केला जात आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणार्या वाहनांची तपासणी करावी. यामध्ये वाहनाचे ऑक्सिजनसह वजन, प्राप्त झालेल्या ऑक्सिजनचे वजन, रिकाम्या झालेल्या वाहनाचे वजन या बाबत पडताळणी करण्याचे सूचित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी
- भाजप नेत्याचे नीच राजकारण ! सीताराम येचुरी यांच्या मुलाच्या निधनावर आक्षेपार्ह टिपण्णी
- कोरोनामुळे वाढते मृत्यू! कैलासनगर स्मशानभुमीतील गॅस दाहिनी होणार दुरुस्त
- राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन शक्य नाहीत; उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती !
- चोरट्यांनी तीन दुचाकी लांबवल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
