🕒 1 min read
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पूर्वनियोजित एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो. १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जाणार आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे अँडरसन न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकला होता. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही विजयाची नोंद करून मालिका ३-० ने जिंकली होती.
अँडरसन बुधवारी म्हणाला की, ‘शेवटचा सामना (न्यूझीलंडविरुद्ध) न खेळणे माझ्यासाठी निराशाजनक होते. त्या सामन्यात संघ मैदानावर चांगला खेळ करत होता. मी या आठवड्यात संघात पुनरागमन करेल अशी आशा आहे. घोट्याची दुखापत आता बरी वाटत असून शुक्रवारी परत येण्याची आशा आहे.’
७ वेळा कोहलीला बाद करणारा गोलंदाज
अँडरसनचे संघात पुनरागमन झाल्यास भारतासाठी मोठे आव्हान असू शकते. तो इंग्लंडचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये अँडरसनने विराट कोहलीला खूप त्रास दिला आहे. विराटला त्याने आतापर्यंत ७ वेळा बाद केले आहे. कोहली सध्या फारसा फॉर्ममध्ये नाही.
बेन फॉक्सही पुनरागमन करू शकतो
अँडरसनशिवाय इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बेन फॉक्सही संघात पुनरागमन करू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत फॉक्स कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. सध्या, तो आता बर्मिंगहॅममधील संघात सामील झाला आहे आणि सराव सत्रांचाही भाग आहे.
एजबॅस्टन येथे शुक्रवारपासून सुरू होणारा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या मालिकेचा भाग आहे. भारतीय संघात कोविडची प्रकरणे समोर आल्यानंतर मालिका मध्येच थांबवावी लागली होती. या मालिकेत आतापर्यंत ४ सामने खेळले गेले असून भारतीय संघाकडे २-१ अशी अभेद्य आघाडी आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
