परभणी : मानवत तालुक्यातील वांगी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्यावर रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी सहाच्या सुमारास छापा मारला. या वेळी दोन पोकलेन, जेसीबी मशिनसह अंदाजे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मानवत तालुक्यातील वांगी येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांना सांगितली. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला.
त्यावेळी तेथे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. या पथकातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी वाळू उपश्यासाठी वापरण्यात येत असलेले दोन पोकलेन, एक जेसीबी मशीन, पाच टिप्पर, सात ट्रॅक्टर, एक लोडर असा अंदाजे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत मानवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे. मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश स्वामी पुढील तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘अब्दूल सत्तारांवर आता कारवाई करणार का?’, खा.जलील यांचा सवाल
- ‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा
- गंभीर कोरोनाबाधितांसाठी मनपाने मागवले दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन
- राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता; जयश्री पाटील यांनी दाखल केली कॅव्हेट
- व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बरं, शिवेंद्रराजे कडाडले


