सातारा : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
याच पार्श्वभूमीवर माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले होते कि, ‘मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या युवकांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकावले आहे. यामुळे त्या युवकांच्या जीवाला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण देण्याची गरज आहे. पोलिसांनी संरक्षण देतानाच त्या युवकांच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यावी, त्यांनी तक्रार न दिल्यास पोलिसांनी पुढाकार घेत स्वत: आमदार शिंदे यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली होती.
या आरोपांवर आता आमदार शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ‘ मी ९६ कुळी मराठा आहे का नाही, हे मला व राज्यातील मराठा समाजातील नेत्यांना व तरुणांना माहीत आहे. मी कधीही मराठा समाजाचे भावनिक राजकारण केले नाही. या समाजासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलने झाली. त्या -त्या वेळी प्युअर मराठा म्हणून आंदोलनात अगदी आझाद मैदानापर्यंत सहभागी झालो होतो. सातारा जिल्ह्यात असो, नवी मुंबईत, कळंबोली असो अनेक ठिकाणी मराठा तरुणांना अटक झाली, ते अडचणीत आले. त्या वेळी मी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली आहे.
साताऱ्यातील त्या मुलांना मीच मदत करत आहे. त्या मुलांनी भावनिक रोषातून आंदोलनाचा निर्णय घेतला असेल; पण त्यांना कोणतीही दमबाजी केलेली नाही. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना विनंती केली. मराठा आरक्षणाचा निर्णय हा एका पक्षाने घेतलेला नाही. मुळात ते ज्या पक्षाचे समर्थन करतात. त्या पक्षांची धोरणे स्पष्ट व्हावीत. देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांचे नेते १०२ वी घटना दुरुस्ती त्यांनीच केली. कायदाही त्यांनीच केला. पुढे सरकार बदलल्यानंतर ते पुढे नेण्याचे काम आमच्या सरकारने केले. त्यांनी अभ्यास करावा. जनतेच्या भावनेशी खेळू नये’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय


