मुंबई : ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संदर्भातील बातम्यांचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा व धमक्या दिल्याचा व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या या अरेरावीचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
‘कोविड आचारसंहितेच्या नावाखाली राज्य सरकारचा आता अतिरेक सुरु आहे. काल लालबाग येथे प्रसारमाध्यमांना झालेली धक्काबुकी हे त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे राज्य सरकार कोविड आचारसंहितेचा वापर आपल्या सोयीप्रमाणे करत आहे, या राज ठाकरे यांच्या विधानाशी मी सहमत आहे’ अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
लालबागचा राजा गणपतीच्या अपडेट बातम्या करण्यासाठी पत्रकार जमले होते. या पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास असतानाही पोलिसांनी पत्रकारांना मंडपात जाण्यापासून रोखलं आणि प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी थेट पत्रकारांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. निकम यांनी स्वत: मास्क न घालता पत्रकारांना धक्काबुक्की करत मंडपातून हकलून देतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांचा पारा आणखी चढला. यावेळी निकम यांनी हातच नाही तर पायही बोलतील, असं म्हणत पत्रकारांना मंडपातून हकलून दिलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. ‘सरकार व पक्षांचे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत, तेथे गर्दी जमत आहे. फक्त सरकारला गणेशोत्सवाची गर्दी नको आहे. नियम हे सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत. एकंदरीत या लॉकडाऊन मध्ये जे चालले आहे ते बर चालले आहे हे सर्व सरकारांना लक्षात आले आहे. आंदोलन नाही, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, लोकांनी रस्त्यावर उतरायचे नाही, त्यामुळे कोणती झंझटच नसल्याने आपापले पैसे कमवा, दुकाने चालवा असेच एकंदरीत धोरण आहे. राज्य सरकार कोरोना आचारसंहितेचा वापर आपल्या सोयीप्रमाणे करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरवेळेस आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी कधी तरी हळहळ व्यक्त करा’, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल
- ‘फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’
- साकीनाका घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, सुमोटो दाखल करत पोलिसांना लिहिले पत्र
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- ‘काहीतरी करायचंय म्हणून कार्यालय हलवू नका’, भुजबळांचा मंत्री कराडांना टोला


