🕒 1 min read
अहमदनगर – अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले यांची निवड निश्चित झाली आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एकच अर्ज आल्याने महापौरपदी रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.
उद्या याबाबतची अधिकृत घोषणा प्रशासनाकडून केली जाईल. दरम्यान, अहमदनगर महापालिका स्थापन झाल्यापासून प्रथमच शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीची मदत घेऊन शिवसेनेचा महापौर होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दीड वाजता संपली. काँग्रेसकडून एकही अर्ज दाखल झाला नाही.त्यामुळे शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची महापौरपदी तर राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड होण्यातील अडथळे दूर झाले आहेत.
अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 22 जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झालं होतं. गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.
महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांना निरोप देताना अडीच वर्षात केलेल्या कामांचं खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रेझेंटेशन सादर केलं. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता स्थापन झाली होती. मात्र पुन्हा योग जुळून आला तर पुढील काळात एकत्र येऊ. अहमदनगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन आघाडी करायला तयार आहोत, असं स्पष्ट मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर होणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता महाविकास आघाडीचाच महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना- 23, राष्ट्रवादी-18, भाजप-15, काँग्रेस-5, बसपा-4, सपा-1, अपक्ष-2
महत्वाच्या बातम्या
- परिवार संवाद दौरा स्थगित; राष्ट्रवादीने विरोधी पक्षाला दिली स्वतः टीका करण्याची संधी
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही असे छातीठोकपणे सांगणारे देशमुख आज पळवाट शोधत आहेत ?
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
