🕒 1 min read
प्रदीप मुरमे : लातूर जिल्ह्यातील राठोडा(ता.निलंगा)येथे महानुभाव पंथाच्या चातुर्मास कार्यक्रमास आलेले १३५६ साधक त्यांच्या जाधववाडी(जि.पुणे) येथील आश्रमात सुखरुप पोहचले असल्याची माहिती राठोड्याचे सरपंच पंकज शेळके यांनी दिली.
जाधववाडी(ता.जून्नर) येथील साधक २७ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान होणा-या महानुभाव पंथाच्या चातुर्मास कार्यक्रमासाठी राठोडा या गावी आले होते.दरम्यानच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॕकडाऊन झाल्यामुळे ते राठोडा गावी अडकून पडले होते.दरम्यान १३ मार्च रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे गावापासून २ कि.मी.अंतरावर उभा करण्यात आलेले मांडव उखडून गेल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली.त्यामुळे सामाजिक अंतराचा मुद्दा चर्चेत आला.त्यावेळी या साधकांनी सरकार व प्रशासनाकडे आपल्याला जाधववाडी या मूळगावी जाण्याबाबत परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती.जिल्हाधिकारी जी.श्रीकांत ,उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार गणेश जाधव यांनी राठोडा गावी भेट देवून साधकांच्या भावना जाणून घेतल्या.त्याचबरोबर नेमकी काय परिस्थिती आहे याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला होता.पालकमंञी अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सरकारने या साधकांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी परवानगी देण्याबाबतची मागणी लावून धरली होती.त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सरकारने या साधकांना मुळगावी जाण्याची परवानगी दिली.त्यामुळे २५ दिवसापासून अडकून पडलेल्या या साधकांचा गावी जाण्याचा मार्ग सुकर झाला.त्यानुसार शनिवारी रात्री ३२ तर सोमवारी रात्री १५ अशा ४७ खासगी बसने हे सर्व १३५६ साधक जाधववाडी येथील आश्रमात सुखरुप पोहचले.सर्व साधक सुखरुप पोहचल्याने प्रशासन,ग्रामस्थ व साधकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.
पालकमंञ्यांचा पाठपुरावा यशस्वी…
लातूर जिल्ह्याचे पालकमंञी अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा केल्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या या साधकांना सरकारने गावी जाण्याची परवानगी दिल्याचे सरपंच शेळके यांनी सांगितले.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंञ्यांचे आम्ही राठोडा ग्रामस्थ अत्यंत आभारी आहोत.त्याचबरोबर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार गणेश जाधव,माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ,प्रेमचंद बियाणे,आरोग्य कर्मचारी,पोलिस कर्मचारी यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभल्यामुळेच चातुर्मास सारखा सतसंगाचा हा मोठा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याची भावना सरपंच पंकज शेळके यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.


