मुंबई : राज्य सरकारने मंदिर खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.
‘तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे.’ असं म्हणत त्यांनी मंदिरं खुली करण्यावरून उद्धव ठाकरेंना जाहीर पत्र पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर, राज्यपालांच्या या पत्राला उद्धव ठाकरे यांनी देखील लगेच प्रत्युत्तर दिलं आहे.
“प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.” असं उत्तर दिलं आहे.
या सर्व घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील भाष्य केलं आहे. “राज्यपालांची भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या निर्णयाचं पालन होतं की नाही, हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिलंय त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे, असं सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी पत्रव्यवहारात अदब पाळला नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या-
- कारशेड हलवणं हा ‘बालहट्ट’ असेल, तर ‘Axis बँके’त सरकारी खाती वळवण्याचा कोणता हट्ट म्हणायचा?
- मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन, प्रविण दरेकर-प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- ‘ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे’
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा


