🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शासनाला वाढत्या बेरोजगारीची व परिणामी युवकांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेची चिंता आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करण्यासाठी राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. वाढती बेरोजगारी ही शासनाची प्रमुख चिंता असून खासगी क्षेत्रांमधील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी 80 टक्के आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करणार आहोत, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.
रविवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात संयुक्त सभागृहापुढे राज्यपालांचे अभिभाषण झाले, त्यावेळी ते बोलत होते. पूरग्रस्तांना आणि अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्यपालांनी 14 व्या विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि त्यांच्या मंत्रिपरिषदेचे अभिनंदन केले.
दरम्यान, विधिमंडळाचं विशेष अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. पुढील हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार आहे.राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती दर्शवणारा अहवाल जनतेसमोर मांडणार असून ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तिला शिस्त आणण्यासाठी सरकार वचनबद्ध राहणार असल्याचं कोश्यारी यांनी काल विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात केलेल्या अभिभाषणात सांगितलं. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि भूमिपुत्रांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून हे सरकार समाजातल्या गोरगरिबांसाठी काम करेल असं ते म्हणाले.
तत्पूर्वी भाजपाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांची काल विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे.
अभिनंदनाच्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस यांनी आपले जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत. जनतेच्या हितासाठी जे काही निर्णय घेतले जातील त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून नेहमीच सहकार्य करू तसंच सभागृहात नियम आणि संविधानानुसार कामकाज करू असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1201405607221190656?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1201405871881740288?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
