उस्मानाबाद – खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपूर, इरळा, रामवाडी, काजळा या भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी भागातील शेतकऱ्यांनी संभाजीराजे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या.
विमा कंपन्या कारणे देऊन पीकवीमा नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी संभाजीराजे यांना सांगितले. तसेच शासनाने अद्याप कोणतीही मदत जाहीर न केल्याचीही खंत व्यक्त केली. यावर संभाजीराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सलग दुसऱ्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेले आहे. विमा कंपन्या भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शासनाची मदत पोहोचत नाही. खराब झालेले पीक काढण्यासाठीदेखील येणारा खर्च पेलवणारा नाही. अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे. शासनाने पंचनाम्यांच्या औपचारिकतेमध्ये न जाता सरसकट मदत जाहीर करावी व विमा कंपन्यांना कडक निर्देश देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकविम्याची भरपाई तात्काळ मिळेल, याची तजवीज करावी, असे सांगत संभाजीराजे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत व भरपाई मिळून त्यांचे जीवनमान पूर्वपदावर यावे, यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.
अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरामध्ये इरला गावातील बालाजी वसंत कांबळे हे तरूण दहा दिवसांपूर्वी वाहून गेले व अद्यापही ते बेपत्ता आहेत. यावेळी संभाजीराजे यांनी त्यांच्या कुटूंबीयांस भेट देऊन त्यांना धीर दिला. घरातील कर्त्या मुलावर अशी परिस्थिती ओढवल्याने वृद्ध आई वडील खचून गेले आहेत. घरची परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे.
याबाबत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी संभाजीराजेंनी फोनवरून संपर्क साधून या कुटूंबास धीर देण्यासाठी तात्काळ मदतीची तरतूद करावी, अशी सूचना केली. तसेच, दुर्दैवाने याबाबत काही अनुचित बातमी आल्यास अपवादात्मक परिस्थीती असल्याने तसा अहवाल करून तात्काळ या कुटूंबास आर्थिक मदत देण्याची ग्वाही यावेळी जिल्हाधिका-यांनी संभाजीराजेंना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका; पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
- धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी झाली खुली; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत


