🕒 1 min read
मुंबई : एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचेच आहेत हे सांगताना येणार उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, व उन्हापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था उभारावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे लसीकरण संदर्भात बैठकीत बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना काल केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी येणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे, निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थान नंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे मात्र दर दिवशी ३ लाख लस दिली पाहिजे यादृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी आरोग्य विभागास सांगितले.
कोविड लसीकरणात १८ मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वलस्थानी आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. आत्तापर्यंत दोन्ही मिळून ३६ लाख ३ हजार ४२४ डोस देण्यात आले असून केवळ राजस्थान 36 लाख 84 हजार डोस देऊन महाराष्ट्रापेक्षा किंचित पुढे आहे असे दैनंदिन लसीकरण अहवालावरून दिसते. कालच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पंतप्रधानांसमवेतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत महाराष्ट्रातील लसीकरण प्रमाण चांगले आहे, असे सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे असले तरी दिवसाला 3 लाख डोस देऊन लसीकरण वाढविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी देखील लसीकरणासाठी आणखी लसीचा साठा मिळावा अशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री रावत यांच्या वक्तव्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा देखील देशातील सर्व न्यायाधीशांना सल्ला
- दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार विद्यार्थ्यांनी तयारी करावी…
- ‘अरे देवा, यांचे गुडघे दिसत आहेत की’; प्रियांका गांधींची तीरथ सिंह रावतवर टीका
- वीरेंद्र सेहवागचे असेही एक टि्वट; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा वापरला फोटो
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
