🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- कृष्णा नदीच्या काठावर निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता पूर पट्ट्यातल्या लोकांसाठी नवं शहर उभारण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. ते काल सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. हे शहर उभारण्यासाठीचा संपूर्ण खर्च राज्यसरकार करेल, असं महाजन यांनी सांगितलं.
शंभर वर्षात पहिल्यांदाच झालेल्या प्रचंड पावसामुळे सांगलीत महापूर आला, पूरबाधीत कुटुंबातील लोकांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, या कुटुंबांना दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ तसंच तातडीच्या मदतीपैकी पाच हजार रुपये रोखीनं दिले जाणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं. शहरी भागात ही तातडीची मदत पंधरा हजार रुपये, ग्रामीण भागात दहा हजार रुपये असल्याची माहिती महाजन यांनी दिली.
दरम्यान, आतापर्यंत राज्यातल्या पूरग्रस्त भागातल्या चार लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. या नागरिकांसाठी चारशे एक्केचाळीस तात्पुरती निवारा केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तेहतीस पथकांसह सैन्य, नौदल, तटरक्षक दलाची एकूण एकशे अकरा बचाव पथकं अद्यापही या भागात कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी वैद्यकीय सेवा कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं पाणी ओसरायला सुरुवात झाली असून, राज्य सरकार तसंच विविध स्वयंसेवी संस्था पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करत आहेत. कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगली बाजारपेठेचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या आठ दिवसांपासून बाजारपेठेतली दुकानं पाण्यात आहेत. तर सहा दिवस बंद असलेल्या पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर काल एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना सध्या या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधले ७० तालुके यंदा पूरबाधीत आहेत. यातल्या पूरग्रस्त गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपत्ती नियंत्रण कक्षानं कळवलं आहे.
महत्वाच्या बातम्या
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
धक्कादायक; तीन महिन्यात राज्यभरात ६१० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अस्मानी संकटानंतर कोल्हापूरकरांवर सुलतानी संकट; जमावबंदीचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

