पुणे : लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यात चार विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आलेली आहेत. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरिश बापट यांना तिकिट देण्यात आलं आहे. तिकीट मिळाल्याने अत्यंत आंनद झाला असल्याचे सांगत ”आता लोकं जात बघून नव्हे, तर काम बघून मतं देतात. पक्षाने मला जी संधी दिली आहे त्याचं मी सोनं करून दाखवेन. पुणे मतदार संघात भाजपच प्रचंड बहुमतानं निवडून येईल” असा ठाम विश्वास बापट यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना बापट म्हणाले की, ”कुणाला उमेदवारी दिली गेली नाही म्हणजे त्याला डच्चू दिला असं मी मानत नाही. अनिल शिरोळे हे देखील चांगले नेते आहेत. पण सारासार विचार करून पक्षाने मला तिकीट दिले आहे. आता मी असं वातावरण निर्माण करेन की संपूर्ण जिल्हा भाजपमय होऊन जाईल” असंही ते म्हणाले. मी जाती-पातीच्या राजकारणाला कधीच घाबरलो नाही आणि घाबरणार नाही” असंही ते म्हणाले.


