🕒 1 min read
सोलापूर : देशाच्या राजकारणात सध्या उतरत्या क्रमाने वाटचाल सुरु असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करुन शुक्रवारी संघटनेची नव्याने फेररचना करण्यात आली. यामध्ये हाय कमांडच्या खास मर्जीतील असणारे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डावलण्यात आले आहे. नव्या दमाच्या काँग्रेस मध्ये जुन्या जाणत्या नेत्याला स्थान मिळाले नसल्यामुळे काँग्रेसमधून “सुशील पर्व” अस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील प्रभावशाली शिंदेशाहीला या पुढील काळात अवकळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशाच्या माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी, दिवंगत राजीव गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या खास मर्जीतील मुरब्बी नेते म्हणून सुशील कुमार शिंदे यांची ओळख आहे. ४० वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांना काँग्रेसमध्ये कायमच मानाचे स्थान होते. काँग्रेस पक्षातील प्रभावी दलित चेहरा म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री म्हणूनही शिंदे यांना पक्षाने मिरवले होते.
त्यानंतर त्यांना राज्यपाल, केंद्रिय ऊर्जामंत्री, गृहमंत्री, लोकसभेतील पक्षनेते, सरचिटणीस, विविध राज्याचे प्रभारी अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. सुशीलकुमारांच्या निवडणूक प्रचारासाठी गांधी घराण्यातील एकतरी बडा नेता हमखास उपस्थित असायचा. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोन्ही हायकमांड याला अपवाद नाहीत.
नव्या दमाचे राष्ट्रीय राजकारणी राहुल बाबा यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यानंतर राज्यातून शिंदे आणि चव्हाण या दोन जेष्ठ आणि बड्या नावांना पद्धतशीरपणे बाजूला हटवले गेले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे पक्षात असलेले सरचिटणीस व अन्य राज्याचे प्रभारी पद दोन वर्षांपूर्वीच काढून घेण्यात आले आहे. कारण सन २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांना सोलापूर मतदार संघातून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर त्यांची कन्या आ. प्रणिती शिंदे यांना विधानसभेवर निवडून आणण्यासाठी त्यांना अथक परिश्रम घ्यावे लागले होते.
गेली कित्येक वर्षे सोलापूर महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या काँग्रेसला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. पक्षाच्या दयनीय अवस्थेला सावरण्यासाठी शिंदे साहेबांकडून विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे या नावाचा प्रभाव कमी होत चालला आहे. या बाबींचा विचार करूनच पक्ष हाय कमांडचा शिंदे साहेबांना विषयीचा दृष्टीकोन बदलला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शुक्रवारी कॉंग्रेस पक्ष संघटनेत देशपातळीवर फेररचनेत करण्यात आली. यामध्ये शिंदे यांच्या नावाला कसलेही स्थान दिले गेले नसल्याचे पहायला मिळाले. पक्षातील जेष्ठांसाठी असलेल्या निमंत्रित, विशेष निमंत्रित यामध्ये ही त्यांना स्थान दिले गेले नाही. नव्या दमाच्या राजीव सातव, रजनी पटेल, मुकुल वासनिक या नेत्यांकडे पक्षाने जबाबदारी दिली असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पक्ष संघटनेत कसलेही स्थान दिले गेले नाही.
पक्षाच्या जीवावर मिळविलेल्या मोठ मोठ्या पदांचा फायदा शिंदे पक्षाला मिळवून देऊ शकले नाहीत. काँग्रेसवर सध्या राहुल गांधी यांचा प्रभाव आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून शिंदे यांचे उपयोगिता मूल्य संपलेले आहे. राज्याच्या राजकारणातही त्यांचे महत्व आणि प्रभाव संपलेले आहे. यावरून काँग्रेस पक्षातून सुशील पर्वाचा अस्त झाल्याचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- फडणवीसांचा पहाटे शपथविधी होवू शकतो, मग मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम तोडले यात गैर काय?
- कोरोनामुळे सर्वच घटकांचे आर्थिक स्तरावर नुकसान झाले आहे, परंतु कोरोनाशी मत करण्यासाठी शिवसेना सर्व शर्थीने प्रयत्नशील – उदय सामंत
- जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अजित पवारांनी भरला दम !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
