नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत हा विषय केंद्रस्थानी ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल वर्ष 2021-22 या वर्षासाठीचा; 3483236 कोटी रुपये खर्चाचा; देशाचा पहिला कागदविरहित अर्थात डिजिटल म्हणजेच अंकीकृत अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
आरोग्य, आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, आकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास, मानवी संसाधनं, नवोन्मेश आणि ‘किमान सरकार कमाल काम’ हे या अर्थसंकल्पाचे सहा प्रमुख स्तंभ असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.
राष्ट्र सर्वप्रथम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण, पायाभूत आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, सुशासन, युवकांसाठी संधी, सर्वांसाठी शिक्षण, महिला सशक्तिकरण आणि सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही या अंदाजपत्रकातून अधोरेखित होते असा दावा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान, हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा उपयुक्त आहे हे जनतेला पटवून देत आहेत तर दुसऱ्या बाजूला विरोधक यातील त्रुटि जनतेसमोर विविध माध्यमातून मांडत आहेत.दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका केली आहे.सरकारने नियोजनशून्यरित्या लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले, त्यांना हा अर्थसंकल्प समर्पित असेल अशी अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनी त्याबाबत चकार शब्दही काढलेला नाही. जीएसटीचे अवाजवी दर सरकार कमी करेल अशी अपेक्षा होती, मात्र त्या दरातही सरकारने कपात केली नाही. ही सर्वसामान्य गरिबांची मोठी फसवणूक आहे. यामुळे महागाई वाढतच जाणार आहे असं ते म्हणाले.
थोरात म्हणाले,कोरोना संकटकाळात मोदी सरकारने अचानक कुठलेही नियोजन करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चाक गाळात रुतले होते, कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. लाखो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या गरीब लोकांना गरीब लोकांच्या खात्यात रोख रक्कम न्याय योजनेच्या माध्यमातून द्यावी अशी मागणी आमचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली असती. केंद्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा होती पण सरकारने गरिब जनतेची घोर निराशा केली आहे.
बिहार निवडणुकीच्या प्रचारावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली होती. आज अर्थसंकल्पात देशवासियांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती पण सरकारने देशाची निराशा केली असं थोरात म्हणाले.
दरम्यान,अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेलं अंदाजपत्रक हे आत्मनिर्भर भारताचं ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे आणि या अंदाजपत्रकामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती होणार असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिक, गुंतवणूकदार, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी अनेक सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशातून व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांचे रवी शास्त्रींबद्दल मोठे वक्तव्य
- या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल : मोदी
- २३ वर्षीय नंदिनी सलोखे ठरली महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- “भारतीय खेळाडू विराटला घाबरतात”, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

