निलंगा/प्रदीप मुरमे- काँग्रेसचे जेष्ठ नेते, मराठवाड्याचे थोर सुपूत्र तथा माजी मुख्यमंत्री डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अखेरच्या निरोप घेण्याने मराठवाड्यासह अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
डाॕ.निलंगेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील रुबी हाॕस्पीटलमध्ये उपचार चालू होते.दरम्यान २ आॕगस्ट रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनी कोरोनावर मात केली होती.दरम्यान मूत्रपिंड निकामी झाल्याने मंगळवारी रात्री २.१५ वा.अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
९ फेब्रुवारी १९३१ रोजी नणंद (ता.निलंगा) येथे मामाच्या गावी त्यांचा जन्म झाला होता.अवघ्या सहा महिन्याचे असताना त्यांचे पितृछत्र हरवले.त्यांच्या मातोश्री वत्सलाबाईंनी मोठ्या धैर्याने व हिमतीने डाॕ.निलंगेकर यांचे संगोपन करुन त्यांना घडविले.गुलबर्गा येथे माध्यमिक, हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठात उच्च शिक्षण तर नागपूर विद्यापीठात त्यांनी पीएचडी मिळवली. १९५१ मध्ये धानोरा येथील सधन शेतकरी आप्पाराव धानूरे यांच्या कन्या सुशीलाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.त्यांना चार मुले व एक मुलगी,जावई,सूना,नातू-पणतू असा मोठा परिवार आहे.
१९५५ पासून निलंगा येथे त्यांनी वकीलीस सुरुवात केली होती.१९६२ पासून ते राजकारणात पूर्णवेळ सक्रीय झाले.१९६२ पासून २०१४ पर्यंत ते या मतदारसंघातून तब्बल १० वेळा निवडून आले आहेत.या ५०-५५ वर्षाच्या थक्क करुन टाकणा-या या प्रदीर्घ कारकीर्दीत या लोकनेत्याने राज्यमंत्री,कॕबिनेट मंत्री,प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री या विविध पदांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याचा अक्षरशः कायापालट घडवून आणला.महसूल,पाटबंधारे,आरोग्य,सार्वजनिक बांधकाम व पशूसंवर्धन आदी खात्यांची धूरा त्यांनी यशस्वीपणे पार पाडून मराठवाड्याचा कायापालट केला.
मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष ठरली.मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी असलेले डाॕ.निलंगेकर राज्याच्या राजकीय पटलावर मितभाषी,शांत, सुस्वभावी व निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जात.चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या दादासाहेबांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर मराठवाडा पोरका झाला आहे.दादासाहेबांच्या जाण्याने लातूर जिल्हा शोकसागरात बुडाला असून राजकारणातील एक संत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे ! वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी सुशीलाताई,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील,डाॕ.शरद पाटील,विजय पाटील हे सुपूत्र,माजी मंत्री संभाजीराव पाटील,अरविंद पाटील हे नातू तर माजी खा.रुपाताई पाटील स्नूषा आहेत.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
‘गर्जना साहेबांची, स्वप्नपूर्ती हिंदूंची’; मुंबईत शिवसेनेची तुफान पोस्टरबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

