मुंबई: ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे काल (४ जानेवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे त्यांचे काल निधन झाले. सिंधुताई यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) यांनीही ट्वीट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना त्यांनी मायेचा आधार दिला. अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे,हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना त्यांनी मायेचा आधार दिला. pic.twitter.com/MTZIPzNdH9
— Ashok Chavan (@AshokChavan1958) January 4, 2022
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. या ठीकाणी लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. अशा लाखो जीवांच्या कैवारी सिंधुताई यांना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान आज पुण्यात ठोसर पागा येथे सिंधुताई यांचा दफनविधी करण्यात येईल. महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने दफनविधी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- सिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”
- आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे
- सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं-अजित पवार
- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल


