सांगली : महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. वीज नियामक आयोगाच्या चौकशीत हे स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भाष्य केलं आहे.
ते सांगली मध्ये बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘महावितरण वीज कंपनीकडून शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या नावाखाली 30 हजार कोटींची लूट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी वीज बिले भरू नयेत आणि लुटण्यात आलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लाववा, असे आवाहन पाटील यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग आहे. शेतकरी संघटनेची जी भूमिका होती, ती योग्य होती, हे आता स्पष्ट झाले आहे. आता तरी शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये आणि वीज बिलाच्या माध्यमातून लुटण्यात आलेले पैसे परत मिळवण्यासाठी सरकारकडे तगादा लावला पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान, ‘शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 33 हजार 856 दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचे महावितरण सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र 22 हजार 856 दशलक्ष युनिट एवढा शेतकऱ्यांचा वीज वापर असल्याचे वीज नियामक आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झालंय,’ अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.


