मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात भूकंपाच्या चर्चांना उधाण आले होते. सुरुवातीला ही भेट गुप्त असून महाविकास आघाडीतील अस्थिरता बघता शिवसेना सावध भूमिका घेत आपल्या जुन्या मित्र पक्षाला साध घालण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. मात्र ही भेट गुप्त नसून सामनाच्या मुलाखतीसाठी देवेंद्र फडणवीसांना आमंत्रित करण्यासाठी झाल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.
या मुलाखती आधी आपल्या काही अटी असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. ‘ आम्ही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या विचारात नाही. जेव्हा हे सरकार आपसातील मतभेदामुळे पडेल तेव्हा बघू’ असे सावध वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तसेच सामनाला मुलाखत देण्याआधी आपल्या काही अटी आहेत. मुलाखत ही अनकट व अनएडीटेड दाखवली जावी असे ते म्हणाले होते. आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी फडणवीसांच्या या अटीची दाखल घेत त्यांना खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“मी फ्रीडम ऑफ स्पीच मानणारा व्यक्ती आहे. ‘सामना’च्या सर्व मुलाखती अन एडिटेडच असतात. फडणवीस यांची मुलाखतही ‘अन एडिटेड असेल. देवेंद्र फडणवीस जे बोलतील ते सगळ्यांसमोर असेल, मग आमच्यावर टीका असो किंवा इतर काही, मुलाखत अनकटच असणार,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
त्यामुळे आता या मुलाखतीची उत्सुकता वाढली असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेचीच सत्ता महाराष्ट्रात आहे मात्र त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले आहे. तेव्हापासून ते आक्रमक विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असून महाविकास आघाडीच्या सरकारला अनेक प्रश्नांवरुन त्यांनी चांगलेच घेरले आहे. त्यामुळे या मुलाखतीमध्ये ते शिवसेनेसह सत्तेतील पक्षांवर काय बोलणार? सत्तेतील आठवणी, कुरबुरी कसे मांडतील? हे औत्सुक्याचे आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- अहमदनगरमध्ये नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट; काल १० मृत्यूसह ६०० नवे बाधित
- आपला पक्ष सांगण्यास कोतकर यांची टाळाटाळ; पदभार घेताना भाजप, शिवसेनेची अनुपस्थिती!
- देशातील पहिल्या महिला अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सेहगल यांचे खास डूडल
- मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी? सामनातून मराठा आंदोलनावर सवाल
- आम्ही मराठा समाजासोबत मात्र त्यांना ओबीसीमधून आरक्षण नको : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे


