मुंबई : गेले दहा दिवस राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यानंतर अखेर आज महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादानंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. यानंतर आज दुपारी पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
राज्यात गेले अनेक दिवस सत्ता संघर्ष सुरु असताना दुसरीकडे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय पूजा कोणता मुख्यमंत्री करणार याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्राभर सध्या आषाढी वारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रभरातून पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्यात. १० जुलैला आषाढी एकादशी आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे हे आषाढी वारीला शासकीय पूजा करतील की देवेंद्र फडणवीसांना पुन्हा पूजेचा मान मिळेल याबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या.
मात्र या दोन्ही नावानंतर आता तिसरच नाव जाहीर झालं आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज एकनाथ शिंदे रात्री ७ : ३० ला शपथ घेणार आहेत. तसेच १० जुलैला होणाऱ्या शासकीय महापूजा देखील त्यांच्याच हस्ते होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आज राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीन शिंदे यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलताना ते म्हणाले कि, भाजपसोबत आमची नैसर्गिक युती असून आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार. आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. फडणवीस सरकारमध्ये नसले तरी ते सरकारच्या पाठीशी आहेत. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. तसेच या सरकारचे केंद्राशीही चांगले संबंध असतील आणि आम्ही राज्यासाठी केंद्रासोबत काम करू, असे सांगितले. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने आम्हाला अधिक बळ मिळेल, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :


