दिल्ली:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, आपचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल (७ डिसेंबर) सिंघू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केजरीवालांवर टीकास्त्र डागलं आहे. एक अशी व्यक्ती जिने केंद्र सरकारने केलेले तिन्ही वादग्रस्त कायदे दिल्लीत लागू करण्यासाठी अजिबात उशीर केला नाही. तिच व्यक्ती आता सार्वजनिक ठिकाणी स्वतःला शेतकऱ्यांचा सेवक म्हणून घेत आहे. त्यांना गहू व तांदूळ यातील फरक तरी माहिती आहे का? असा सवाल सिंह यांनी केजरीवाल यांना केला आहे.
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- भारतीय वंशाच्या ‘या’ नशीबवान व्यक्तीला सर्वात प्रथम मिळणार कोरोनाची लस

