टीम महाराष्ट्र देशा : स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात हलवण्यात आला आहे. त्यामुळे आता रायगडमधून या प्रकल्पाला विरोध होऊ नये यासाठी भाजपनेत्यांनी वेळीच सावध पाऊलं उचलली आहेत. कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रकल्पाबाबत चर्चा केली आहे.
स्थानिकांच्या विरोधामुळे गेल्या काही वर्षात नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प चांगलाच वादात अडकला होता. मात्र आता हा प्रकल्प नाणार येथून हलवला असून रायगड जिल्ह्यात उभारला जाणार आहे. त्यामुळे आता तरी प्रकल्पात काही अडचणी येऊ नयेत म्हणून पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. या भेटी वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
या भेटीमध्ये प्रधान यांनी प्रकल्पासाठी शिष्टाई केली असली तरी उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे समजते. नाणार येथील प्रकल्पास शिवसेनेचा स्पष्ट विरोध आहे. रायगडबाबत शिवसेनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. प्रधान यांच्या चर्चेतही उद्धव यांनी ऐकून घेण्याचीच भूमिका घेतल्याचे समजते.
दरम्यान अरेबियाची अरमाको, इंडियन अाॅइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून उभारला जाणारा हा प्रस्तावित प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असणार आहे. मात्र या प्रकल्पाला नाणार येथील स्थानिकांनी विरोध केला होता. तर स्थानिकांची बाजू घेत शिवसेनेने या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली होती.


