बीड : बीड जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादत सर्व दुकाने बंद करण्यात आले. यामुळे व्यावसायिकांसह मजुरांवर उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊन हटवण्यात यावे, या मागणीसाठी सर्व व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेतली. लॉकडाऊन न हटवल्यास मंगळवारपासून व्यापारी दुकाने उघडणार असल्याचा इशारा लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ‘नही चलेगी, नही चलेगी, हुकूमशाही नही चलेगी, लॉकडाऊन वापस घ्या’, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून सुरुवातीला व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतकऱ्यांनी, लॉकडाऊन, संचारबंदीचे स्वयंस्फूर्तीने पालन केले. मात्र, आता वर्ष उलटले तरी कोरोनाची स्थिती जशीच्या तशी आहे. व्यापारी, व्यावसायिक नियमांचे पालन करत आहेत. पण कडक निर्बंध व लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांचे मोठे नुकसान होत आहे.
लॉकडाऊनमुळे रोजीरोटी, सर्व आस्थापना, व्यवसाय, दुकाने, सेवा, मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने, तर खासगी क्लासेस सकाळी १० ते सायंकाळी सातपर्यंत दररोज उघडण्यास परवानगी द्यावी, आम्ही सर्व नियम व अटी पाळू असेही निवेदनात म्हटले आहे. अन्यथा मंगळवारपासून दुकाने सरसकट उघडू असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचितचे अशोक हिंगे, एमआयएमचे शेख शफिक, आपचे अशोक येडे, व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर गायकवाड आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या :
- अंबाजोगाईच्या ‘त्या’ दाम्पत्याच्या मृत्युबाबत ट्विस्ट, अमेरिकेतील मीडियाने केला ‘हा’ दावा
- परभणीत केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीचा रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवणार
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- अॅपमधील बिघाडामुळे फ्रंटलाइन वर्कर्स लस मिळण्याच्या प्रतिक्षेत!
- आता कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल; नारायण राणेंच भाकीत

