मुंबई – देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील २९ लाखापेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालयमार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म ‘ओएलएक्स’ अॅपच्या धर्तीवर तयार करण्यात आला असून १२ डिसेंबर रोजी याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते एका कार्यक्रमात लोकार्पण करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
याचबरोबर सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे ई-बार्टी हे मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून दिनांक १२ रोजी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या लाईव्ह सोहळ्यामध्ये या पोर्टलचे व ई-बार्टी लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री महोदय व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत.
धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
दिव्यांग व्यक्तींना विविध आधुनिक उपकरणे वापरून सामान्य व्यक्तिप्रमाणे जीवन व्यथित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हील चेअर असे दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही. समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खाजगी कंपन्या, उद्योजक असे अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असतात, या गरजू दिव्यांग व्यक्तींची व दात्यांची सांगड घालून देण्याचे काम ‘महाशरद’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
‘महाशरद’ प्लॅटफॉर्म वर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ दिनांक १२ डिसेंबर रोजी सुरू होत असून मार्च २०२१ अखेरपर्यंत मोबाईल ऍप्लिकेशन स्वरूपात देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.’महाशरद’ चा ‘महाराष्ट्र सिस्टीम ऑफ हेल्थ रिहॅबिलिटेशन अँड असिस्टंस फॉर दिव्यांग’ असा विस्तार असून खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याचे लोकार्पण करताना आपल्याला अत्यंत आनंद होत असून, या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून २९ लाख दिव्यांग व्यक्तींपर्यंत मदत पोचवण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले.
‘ महाशरद’ हे डिजिटल प्लॅटफॉर्म पोर्टल शनिवारपासून सुरू होत असून ते अँड्रॉइड ऍप्लिकेशनच्या स्वरूपात प्ले-स्टोअर वर लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. विभागातील अधिकारी, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग वित्त महामंडळ यातील अधिकारी, कर्मचारी यांनी अत्यंत कमी वेळेत ‘महाशरद’ प्लॅटफॉर्म साकारले असून, याचे मोबाईल ऍप्लिकेशन मार्च २०२१ पर्यंत प्ले-स्टोअरवर उपलब्ध होईल.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव शाम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक धम्मदीप गजभिये आदी उपस्थित होते.१२ डिसेंबरपासून गरजू दिव्यांग नागरिक तसेच इच्छुक दात्यांना या पोर्टलवर नोंदणी करता येणार असून, कोणत्या प्रकारची मदत, सहाय्यक उपकरण किंवा अन्य सहाय्य आवश्यक आहे याबाबत दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार यावर सविस्तर वर्गीकरण देण्यात आले आहे. गरजू दिव्यांग नागरिक व त्यांना सहाय्य करू इच्छिणाऱ्या विविध सामाजिक घटकांना एकत्र करून मदत मिळवून देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे मोबाईल अँप्लिकेशन तयार करण्यात आले असून, याचेही लोकार्पण दिनांक १२ डिसेंबर रोजी याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. ई-बार्टी (E-Barti) हे ऍप्लिकेशन प्लेअर स्टोअरवर उद्यापासून उपलब्ध होणार आहे.या अॅपमध्ये एम – गव्हर्नन्स सहित, बार्टीतील सर्व योजना, इ- लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अधिछात्रवृत्ती योजना आदी सर्व योजना एका क्लिकवर मोबाईलवरून हाताळता येणार आहेत. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, तक्रार निवारण, अभिप्राय आदी सुविधांसह विविध जातीच्या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठीही हे ऍप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Shrad Pawar Birthday : हत्तीची चाल, वजिराचा रुबाब… शिवसेनेच्या शरद पवार यांना खास शुभेच्छा
- Shrad Pawar Birthday : शरद पवारांना पंतप्रधान मोदींनी दिल्या खास शुभेच्छा
- “कुणीही येतंय चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा”; ममता बॅनर्जींची भाजपावर तुफानी टीका
- बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
- अल्पसंख्याक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

