Share

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार : पालकमंत्री दत्तात्रय भरणे  

Published On: 

सोलापूर-  दररोज बिबट्याचा वावर वेगळ्या गावात आढळत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतानाकाळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वन विभाग लवकरच बिबट्याला जेरबंद करेल किंवा ठार मारेल. बिबट्या ड्रोनद्वारेही न सापडल्यास हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जाईल, असा विश्वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अंजनडोह ग्रामस्थांना दिला.

भरणे यांनी काल बिबट्याचा वावर असलेल्या करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, सरपंच विनोद जाधव, पोलीस पाटील अंकुश कोठावळे, जिल्हा परिषदेचे सदस्य सवितादेवी राजेभोसले,माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी बिबट्याच्या त्रासाची माहिती दिली. शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली.

यावर भरणे यांनी सांगितले की, तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन व्यक्तींचा जीव गेलेला आहे, ही दुर्दैवी घटना आहे. बिबट्याला ठार मारण्याची परवानगी नागपूर वन विभागाकडून मिळवली आहे. या भागात चार-पाच बिबटे असण्याची शक्यता आहे, मात्र सर्व हल्ले करीत नाहीत. या ‘बिबट्याला’ कोठेतरी जखम झाली असेल, त्यामुळे तो मानवावर हल्ले करत आहे.

वीज वितरण कंपनी आणि वन विभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. येत्या डिसेंबरअखेर फिडरचा विषय मार्गी लावून दिवसा वीज मिळेल. अंजनडोहच्या शिंदेवस्तीवर महावितरणने पोलची व्यवस्था करून वीज द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. कर्जमुक्तीबाबत बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीक कर्जासाठी सातबारा कोरा करण्यास सांगितले जाईल. डिकसळ पूल आणि रस्त्याचे काम जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करून घेतला आहे. यासाठी दोन कोटी रूपये मंजूर करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही भरणे यांनी सांगितले.

आमदार शिंदे यांनी सांगितले की, बिबट्याचा वावर असलेल्या भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, यासाठी वन विभाग आणि महावितरणने समन्वय करावा. फिडरनिहाय जो बदल करायचा तो करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी. पडळकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणची टीम काम करीत आहे. कटफेज टाकून दिवसा वीज देता येईल. शेतकऱ्यांनी शेतीपंपाला कपॅसिटर बसवावा. यामुळे कमी व्होल्टेज असेल तर समस्या येणार नाही. कायमस्वरूपी दिवसा वीज देण्यासाठी अपारंपरिक विजेची तरतूद आहे. त्यानुसार गायरान किंवा शासकीय जमिनींचा शोध सुरू असून त्याठिकाणी सौर प्रकल्प उभारून दिवसा वीज देण्याचा प्रयत्न महावितरण करीत आहे.

उपवनसंरक्षक पाटील यांनी सांगितले की, बिबट्याचा ठावठिकाणा 16 नोव्हेंबरपासून ट्रॅक करणे सुरू आहे. मात्र बिबट्या रोज ठिकाण बदलत असल्याने आणि या परिसरात ऊस, केळीची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने पकडणे अवघड जात आहे. मात्र 21 पिंजरे, तीन ड्रोन कॅमेरे, 42 ट्रॅप कॅमेरे, पाच शार्प शुटर, दोन बेशुद्ध करणारे पथक, एक डॉग स्क्वॉड अशा 16 वेगवेगळ्या टीम दिवसरात्र कोबिंग ऑपरेशन करीत आहेत. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणेची मदत होत असून राज्य राखीव पोलीस दलाचीही मदत घेण्यात येणार आहे. सर्व यंत्रणा बिबट्यासाठी वापरतोय, मात्र बिबट्या रोज ठिकाण आणि मार्ग बदलत आहे. बिबट्याला लवकरच ठार मारू, नागरिकांनी काळजी घ्यावी. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनातर्फे 15 लाखांची मदत दिली जाणार असून पहिल्या टप्प्यात पाच लाखांची मदत दिली आहे.

हारचंद कोटली (रा. सध्या चिखलठाण, मूळ-दुसाणे, ता. साक्री, जि. नंदूरबार) या ऊसतोड कामगाराची सात वर्षीय मुलगी फुलाबाईला बिबट्याने ठार मारले होते. भरणे यांच्या हस्ते कोटली कुटुंबियांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!