बीड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सध्या जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. पण आता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून आता जिल्ह्यात १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. त्यात एकट्या परळी मतदारसंघात शासन नियमाच्या अधीन राहून ३ हजार रेमडिसिविर इंजेक्शन मिळणार आहेत.
दहा हजार इंजेक्शनपैकी तीन हजार इंजेक्शन हे शासन नियमाच्या अधीन राहून परळी मतदारसंघातील गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील व या इंजेक्शनचा खर्च धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी येथील नाथ प्रतिष्ठानमार्फत केला जाईल, अशी माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली. परळीत हे रेमडेसिविर इंजेक्शन गरजूंना मोफत मिळणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
परळी शहरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजूंना नाथ प्रतिष्ठानमार्फत हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात असून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. पर्यायाने मेडिकलमध्ये काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शासकीय रुग्णालयांत औषध प्रशासन विभागामार्फत आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करण्यात येतात. पण खासगी रुग्णालयांत रुग्ण आणि नातेवाइकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना भटकंती करावी लागत आहे. त्यांचे हे हाल थांबवून रुग्णाला वेळेवर इंजेक्शन मिळावे म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी औषध प्रशासन विभाग, उत्पादक व वितरक यांच्याशी समन्वय साधून शासन नियमांच्या अधीन राहून जिल्ह्यासाठी आगाऊ १० हजार इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. हे इंजेक्शन शासकीय यंत्रणेद्वारे वितरकांमार्फत खासगी रुग्णालय व नातेवाईकांना दिली जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लातूर जिल्ह्यात शुक्रवारी २० जणांचा मृत्यू; १७६७ पॉझिटिव्ह रुग्ण
- प.बंगालमध्ये पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 853 तुकड्या तैनात
- ‘अजित पवार…तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या’
- रेमडेसिव्हिरचा काळाबाजार! घाटीतील कर्मचारी, मेडिकल चालकासह तिघे अटकेत
- पैठणमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी


