मुंबई : कैकाडी समाजाचा विदर्भात अनुसूचित जाती प्रवर्गात तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गात समावेश आहे. क्षेत्रबंधन उठवून विदर्भातील कैकाडी समाजाप्रमाणेच राज्यातील उर्वरित भागातील कैकाडी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सवलतींचा लाभ मिळायला हवा, अशी कैकाडी समाज गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती.
त्यामुळे आता संपूर्ण राज्यातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात येणार आहे. त्याबाबतचा ठराव विधिंडळात आणून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून त्यांचा सरसकट अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा, या मागणी संदर्भात आज दृश्य प्रणाली द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, आमदार यशवंत माने इत्यादी उपस्थित होते.
वीस लाखांच्या आसपास लोकसंख्या
कैकाडी समाज हा राज्यात वीस लाखांच्या आसपास असला तरी विखरुलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या समाजाची लोकसंख्या सत्तर हजारांवर आहे. औरंगाबादसह जालना, माजलगाव, बीड, उस्मानाबाद या ठिकाणी हा समाज प्रामुख्याने दिसतो. हा समाज प्रामुख्याने भटकंती करणारा समाज म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक राज्यातही हा समाज मोठ्या संख्येने आहे. शिक्षणाचे प्रमाण पूर्वीच्या पिढीत अत्यंत कमी असल्याने कैकाडी समाजातील युवा पिढीला मोठा संघर्ष करावा लागत आहे.
कैकाडी समाजात नऊ पोटजाती
कैकाडी समाजाचा पारंपरिक व्यवसाय टोपल्या तयार करणे, पक्षांचे पिंजरे तयार करणे, मुलांची खेळणी तयार करणे, टोपल्यांतील साप लोकांना दाखवून गुजराण करणे हा आहे. तसेच गाढवांवरून वाळू, खडी फोडणे, माती, विटा आदी वाहून नेण्याचे कामही समाजातील काही लोक करतात. काही लोक शेती व मजुरीचे काम करतात. कैकाडी समाजात नऊ पोटजाती आहेत. त्यात बोरीवाले, धनताळे, कामाठी, काइजी, लमाण, माकडवाले, उरू कैकाडी, वाइबेस, भामटे या पोटजातींचा समावेश होतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
- ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’ ; भाजपाची ठाकरे सरकारवर जहरी टीका
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या


