मुंबई : भाजपने मागील दोनही दिवस सरसकट कर्जमाफी आणि महिला अत्याचार या मुद्द्यांवरून गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. तर बुधवारी देखील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वा. सावरकर यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले. राज्य विधानसभेतील हा अभूतपूर्व प्रसंग असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘गेले 25 ते 30 वर्ष मी शिवसेना पाहतो आहे. पण, यापेक्षा लाचार मी शिवसेनेला कधीच पाहिले नाही. कुठे मणिशंकर अय्यर यांच्या छायाचित्राला जोडे मारणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मुख्यमंत्री,’ अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘आम्ही अभिरूप विधानसभा भरवून त्याच पवित्र सभागृहात गौरवाचा प्रस्ताव मंजूर केला. ज्या पद्धतीचे लिखाण ‘शिदोरी’ मासिकात आहे, ते पाहता काँग्रेसच्या नेत्यांना अंदमानच्या कालकोठडीतच पाठविण्याची गरज असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी येथे यावेळी बोलताना मांडले.
दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता स्थापान झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला हिंदुत्त्वावाच्या मुद्द्यावरून अनेकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. स्वा. सावरकरांना गौरव प्रस्ताव देण्याचा मुद्द्यावरून सभागृहात बराच वादंग झाला. अशातच विधानसभा अध्यक्षांनी गौरव प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजप अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनाचा मुख्यमंत्री असताना गौरव प्रस्ताव फेटाळला गेल्याने शिवसेनेने खरचं हिंदुत्त्व सोडले आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

