औरंगाबाद : गरीब, गरजू लोकांना अल्पदरात भोजन मिळावे म्हणून ठाकरे सरकारने सुरुवातीला १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली होती. पण आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर वंचितांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचे जाहीर केले. परंतू आता सरकारने कडक निर्बंध लागू केल्याने या शिवभोजन थाळीची वेळ अन्य सेवांप्रमाणे सकाळी ७ ते ११ केल्याने नागरिकांत नाराजी आहे.
एवढ्या सकाळी भोजनाची वेळ नसल्याने जी वेळ सरकारने दिली आहे ती योग्य नाही. त्यामुळे गरीब आणि गरजू या योजनेपासून वंचित राहात आहेत. सरकारने याचा विचार करून ही वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोनाची दुसरी लाट वेगात असून मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. त्यात किराणा माल आणि भाजीपाला यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सरसकट सामाजिक संस्था आणि महिला बचत गट गरीबांना शिवभोजन थाळी देऊ न त्यांची भूक भागवत होते.
पण त्यांनाही हे निर्बंध लागू झाल्याने या बचत गटांना सकाळी ११ च्या आत सर्व पसारा आटोपता घ्यावा लागत आहे. या वेळेत शिवभोजन थाळीसाठी काही लोक येत असून ज्या भावनेने शिवभोजन थाळी सरकारने गरीब आणि गरजूंना देण्यासाठी ही योजना सुरू केली, परंतु या नव्या निर्बंधांमुळे सरकारचा उद्देश सफल होत नसल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला अटक
- #Virar : भंडारा, भांडुप, नाशिक येथील घटनांमधून राज्य सरकारने कोणताच धडा घेतला नाही
- अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई
- राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण – उदय सामंत
- ‘विरारची दुर्घटना नॅशनल न्यूज नाही’, आरोग्यमंत्री टोपेंचे धक्कादायक वक्तव्य

