मुंबई: अमरावतीच्या खासदार-आमदार पती-पत्नीवर पोलिसांनी त्यांच्या अतिरेकी वागण्याबद्दल कारवाई केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचायची असेल तर ती तुमच्या घरात वाचा. कोणी अडवलंय? पण दुसऱ्यांच्याच घरात जाऊन वाचू हा अट्टहास का, असा प्रश्न मुंबईच्या हायकोटनिही विचारला आहे. तरीही राणा दांपत्यावरील कारवाई म्हणजे हिटलरशाही वगैरे असल्याचे फडणवीस बोलतात. श्रीमती राणांचा छळ केला, त्यांना साधे पाणीही दिले नाही. त्या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचा छळ केला, अशी थिल्लर पद्धतीची विधाने करणे देवेंद्र फडणवीस यांना तरी शोभत नाही. असा टोला संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून लगावला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा खार पोलीस स्टेशनातील शाही पाहुणचाराचा व्हिडीओच समोर आणला. त्यामुळे राणांपेक्षा फडणवीस यांचीच पोलखोल झाली आहे. दुसरे असे की, श्रीमती नवनीत राणा या कधीपासून मागासवर्गीय झाल्या? त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरले आहे. त्यांनी देशाची फसवणूक केली. त्याबद्दल मुंबई पोलिसांनी कारवाई केली. त्यावरून महाराष्ट्र सरकार तत्काळ बरखास्त करावे असे फडणवीस म्हणत असतील तर दादा कोंडके (Dada Kondke) यांना या ‘पांडू’गिरीवर ‘भाजपचे हवालदार’ असाही एक चित्रपट काढावा लागला असता. असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना याबाबत एक सविस्तर पत्र लिहिले याबद्दल आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. फडणवीस यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र भाजप ज्या मानसिक संक्रमणावस्थेतून जात आहे ते पाहता त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही. 2019 सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे. महाराष्ट्रावर कठोर कारवाई करा म्हणजे काय करायचे? तर या मंडळींना वाटतेय म्हणून राष्ट्रपती राजवट लावून मोकळे व्हायचे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाडय़ा’ चित्रपट काढला असता. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “नवे सोंगाडे, दादा कोंडके हवे होते!”, ‘सामना’तून भाजपवर प्रहार
- IPL 2022 RCB vs RR : पुण्यात राजस्थानचा ‘रॉयल’ खेळ; बंगळुरूला २९ धावांनी दिली मात!
- IPL 2022 RCB vs RR : रियान परागचं झुंजार अर्धशतक; राजस्थानचं बंगळुरुला १४५ धावांचं आव्हान!
- IPL 2022 खेळणाऱ्या धोनीच्या बायकोला ‘या’ गोष्टीचा होतोय त्रास; ट्वीट करत विचारला जाब!
- तब्बल १८ दिवसांनी गुणरत्न सदावर्ते तुरुंगातून बाहेर! म्हणाले, “हा एसटी कामगारांचा विजय…”

