मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची झालेली जेलवारी ही तब्बल १८ दिवसांनंतर संपली.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. सुरुवातीला शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरु झाली होती. त्यानंतर पुणे, सातारा, बीड, कोल्हापूर, सोलापूर, अकोला इथपर्यंत ही मालिका येऊन पोहचली. सदावर्ते यांना आज पुणे पोलीस ताब्यात घेणार होते. मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्याने आज १८ दिवसांनंतर ते जेलमधून बाहेर पडले आहेत.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर सदावर्ते यांनी ‘हम है हिंदुस्थानी अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ” संविधानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. झेन सदावर्ते, माझी १३ वर्षाची मुलगी, माझी बायको जयश्री पाटील यांनी मला माझ्यावरील अन्यायाविरोधात साथ दिली. महाराष्ट्रातील आणि हिंदुस्थानातील कष्टकरी माझ्या सोबत राहिले. यापुढें भ्रष्टाचार निर्मूलन आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम साठी जे जे करता येईल ते करू. हा विजय हिंदुस्थानी नागरिकांचा, एसटी कामगारांचा आहे,” एवढे बोलून सदावर्ते गाडीत बसून घराकडे रवाना झाले.
गुणरत्न सदावर्ते यांनी आपले जेलमधील १८ दिवस कसे गेले याबद्दल ही सांगितलं. ” मी पहिल्यांदा पोलीस कोठडीत होतो तेव्हा, तिथे एका पोलीस शिपायाचा जीव वाचवू शकलो. एका पोलीस शिपायाला हृदयविकाराचा झटका आला होता. कोणत्याही फौजदाराला प्रथमोपचार माहित नव्हते. मी त्यांना आर्टिफिशीयल रेस्पिरेशन देऊन वाचवू शकलो. मी जिथे जिथे गेलो तिथे योगाचं शिक्षण दिलं. मी अध्यात्मिक विषय सांगितले. तुम्ही वाईटातली वाईट गोष्ट बाजूला करून, चांगल्यांना चांगलं शिकवू शकता. हे मी जेलमधील १८ दिवसात शिकलो,” असे सदावर्ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :


