मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी हे ईडीच्या तीन अधिकार्यांसह, विशिष्ट व्यावसायिकांना लक्ष्य करून खंडणी रॅकेट चालवत आहेत आणि त्यांना पैशाच्या बदल्यात ईडी चौकशीपासून संरक्षण देत आहेत असा आरोप केला होता. तसेच मुंबईतील बिल्डर्स आणि व्यावसायिकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला होता.
आता महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचालनालय अधिकार्यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा दावा करून अनेक व्यावसायिकांकडून सुमारे ५९ कोटी रुपये गोळा केल्याप्रकरणी गुन्हा जितेंद्र नवलानी यांच्या विरोधात नोंदवला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांचा सहकारी नवलानी आहेत असेही बोलले जात आहे.
मार्चमध्ये शिवसेना पक्षाचे कार्यकर्ता अरविंद भोसले यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी वीरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. “आमच्या तपासादरम्यान, २०१५ ते २०२१ दरम्यान आरोपींनी ५८.९६ कोटी रुपये गोळा केल्याचे समोर आले. अशा प्रकारे गोळा केलेला पैसा एकतर त्याच्याकडे किंवा त्याच्या नियंत्रणाखालील शेल कंपन्यांकडे असुरक्षित कर्ज किंवा सल्लागार शुल्काच्या रूपात ठेवण्यात आला होता,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
यानंतर, एसीबीने नवलानी आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७अ (लोकसेवकांना बेकायदेशीर मार्गाने प्रभावित करण्यासाठी अवाजवी फायदा घेणे) आणि ८ (लोकसेवकाला लाच देणे संबंधित गुन्हा) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही रक्कम भरल्यास त्यांना ईडीच्या छाप्याला सामोरे जावे लागणार नाही, असे सांगून नवलानी यांनी अनेक व्यावसायिकांकडून पैसे गोळा केले होते.
संजय राऊत काय म्हणाले होते?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी सीबीआय आणि आयटीच्या धाडीवरुन हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी एक नाव घेतले, ते म्हणजे जितेंद्र चंद्रलाल नवलानी. यांच्यावर अनेक आरोप राऊत यांनी केले होते. जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीचे वसुली अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांना सध्या दिल्लीत पदोन्नती मिळाली आहे. जितेंद्र नवलानी हे ७ कंपन्याचे संचालक असून त्यांनी या सात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी शेकडो कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये आयकर विभागाने नवलानी आणि त्यांच्या पत्नीला बेनामी संपत्तीप्रकरणी नोटीसही पाठवली होती. असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या –

